आषाढी वारीला आलेल्या वारकरी भाविकांच्या सोईसाठी मंदिर समिती सुसज्ज.
आषाढी एकादशी रविवार, दिनांक 06 जुलै रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 12 ते 15 लाख वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, तात्पुरत्या स्वरूपातील उड्डाणपुले, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा खिचडी वाटप करण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व खाते प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक आहेत, या भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पंरपंरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22.15 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे. याशिवाय, संकेतस्थळावरून व जागोजागी एलईडी टिव्हीद्वारे लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, संतांच्या भेटी, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला, प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय, कर्मचा-यांना प्रशिक्षण, रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी साठी जादा स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट इ. ठिकाणची स्वच्छता करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे. याशिवाय, आरोग्य विभागामार्फत दर्शनमंडप व पत्राशेड येथे आयसीयु, गोपाळपूर, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा २०२५.
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला.……।
सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री.रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
दुपारी 12 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजा सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या शुभहस्ते पार पडली.
त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला. यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. असल्याची माहिती मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
या साठी संगणक विभागातर्फे लाईव्ह स्ट्रीमिंग सेटअप सेट सेट करण्यात आला होता. मंदिराच्या प्रांगणात लावलेल्या एलएड डिस्प्लेवर लाइव्ह स्ट्रीम दाखवण्यात आले
नवरात्र महोत्सव निम्मित सजावट करण्यात आली सजावट करणार विठ्ठल भक्त राम जांभूळकर
मंदिर समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी--व्यवस्थापक मनोज श्रोत्री.
पंढरपूर (ता.02) प्रतिवर्षीप्रमाणे दि. 03 ते 18 ऑक्टोंबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिरात आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करुन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली असून, त्या अनुषंगाने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील स्वच्छता, दर्शनरांग सुलभ व द्रुतगतीने चालविण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन, किर्तन, गोंधळ, पंचसुक्त पवमान अभिषेक, रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वंयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाची भजने संपन्न होणार असल्याचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगीतले.
त्याचबरोबर अंबाबाई मंदिर, यमाई तुकाई मंदिर, रेणूकादेवी मंदिर, लखुबाई मंदिर, यल्लमादेवी मंदिर, पद्यमावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरांच्या ठिकाणी ऊन, वारा व पाऊसापासून संरक्षणासाठी कापडी मंडप, बॅरीकेटींग, स्वच्छता , पिण्याचे पाणी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्र कालावधीत रूक्मिणीमातेस पारंपारीक पध्दतीचे विविध पोषाख करून अलंकार परिधान करण्यात येतात. सदरचे अलंकार पुरातन व दुर्मिळ असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व अलंकार नव्याने गाठविण्यात आलेले आहेत. तसेच संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, सदरचा उत्सव पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सर्व खातेप्रमुख व अधिनस्त कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले
विठ्ठल रूक्मिणीमातेच्या ऑनलाईन पुजा नोंदणीला भाविकांचा प्रतिसाद --कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
* श्री. विठ्ठलाच्या नित्यपुजेची माहे डिसेंबर पर्यंत संपूर्ण नोंदणी.
* * महाराष्ट्र राज्यासह आसाम, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून पूजा नोंदणी.
पंढरपूर (ता.02) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून, दि. 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात आली होती. या सुविधेला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये उपलब्ध झालेल्या पुजेमधून विठ्ठलाच्या नित्यपुजेची संपूर्ण नोंदणी झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे, यावरून सदर प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबवण्यात आली आहे. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या 17 नित्यपुजा, 88 पाद्यपुजा व 30 भाविकांनी तुळशीपूजा नोंदणी केल्या आहेत.
या ऑनलाईन पध्दतीच्या नोंदणीचा शुभारंभ दि. 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.00 वाजता मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या शुभहस्ते व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ, राजेंद्र घागरे, बलभिम पावले व सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी उपस्थित होते. भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजेची नोंदणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पुजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पुजा नोंदणी करता येत असल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त होत असल्याचे व्यवस्थापक मनेाज श्रोत्री यांनी सांगीतले
मंदिर समितीच्या गोशाळेतील खोंडे शेतक-यांना मोफत वाटप.---व्यवस्थापक मनोज श्रोत्री.
पंढरपूर (ता.01) श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीची पंढरपूर नगरपरिषद हद्दीत यमाई तलाव येथे गोशाळा आहे. या गोशाळेत सुमारे लहान-मोठी 250 गाई-वासरे आहेत. सदर गोशाळेतील खोंडे गरजू शेतक-यांना योग्य त्या अटी व शर्तीवर पाळावयास देण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये 20 शेतक-यांनी अर्ज दाखल होते. दिनांक 30 सप्टेंबर रोजी आलेल्या अर्जाची छाननी करून ईश्वर चिट्टीद्वारे निवड करून 13 गरजू शेतक-यांना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या शुभहस्ते 15 खोंडाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी 1 ते 2 खोंडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावेळी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत सर्वगोड, सहायक विभाग प्रमुख मोहन औसेकर, गोशाळेतील कर्मचारी वर्ग व अर्जदार शेतकरी उपस्थित होते. सदरची प्रक्रिया मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व गोशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गोशाळेतील गाईंच्या संगोपणासाठी पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी व पुरेसा प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. आजारी गाईंची आवश्यक ती काळजी घेण्यात येते. सदर गाईंची विमा देखील उतरविण्यात आला आहे. त्यांना चारा म्हणून पशुखाद्य, देशी ज्वारीचा कडबा, हिरवा चारा इत्यादी खाद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी कापडी / पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या गाईंपासून मिळणा-या दुधाचा वापर श्रींच्या नित्योपचारासाठी करण्यात येतो. तसेच गोशाळेसाठी चारा किंवा देणगी द्यायची असल्यास यमाई तलाव येथील गोशाळेच्या कार्यालयात किंवा मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी केले.
मंदिर समितीच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी
पंढरपूर (ता.30) श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास होण्या-या अतिरिक्त खर्चास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांची सेवा मंजुर आकृतीबंधानुसार माहे जानेवारी, 2019 पासून संरक्षित केली आहे. तसेच माहे जून, 2019 पासून सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र, आस्थापनेवरील खर्चास 10% ची मर्यादा असल्याने 50%, 75% व 100% महागाई भत्ता व 5% घरभाडे भत्ता देण्यात येत होता. तथापि, मंदिर समितीने सन 2022–2023 या आर्थिक वर्षापासून आस्थापनेवरील सर्व कर्मचा-यांना 203% महागाई भत्ता व 10% घरभाडे भत्ता लागू केला आहे. मात्र, दि.03/01/2019 ते दि.31/03/2024 या कालावधीतील महागाई व घरभाडे भत्त्याच्या फरक दिलेला नव्हता. तसेच शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्याबाबत कर्मचा-यांकडून वारंवार मागणी होत होती.
आषाढी एकादशी दिवशी म्हणजे दिनांक 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूरला आले होते. त्यावेळी आस्थापनेवरील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग मिळणेबाबत चर्चा करून विनंती केली होती. त्यावर त्यांनी प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा, शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासित केले होते. त्यानुसार मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेऊन धर्मादाय आयुक्त यांच्या मंजुरीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तद्नंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दि.20 सप्टेंबर रोजी मंत्रालय येथे व दि.21 सप्टेंबर रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. त्यास दि. 30 सप्टेंबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे.
मंदिर समितीच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत विविध संवर्गातील 225 कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचा-यांना सध्या सहावा वेतन आयोग लागू आहे. आता शासनाच्या मंजुरीने 7 वा वेतन आयोग लागू होऊन प्रतिमहा 7 ते 10 हजार इतकी भरघोस वेतनवाढ होणार आहे. त्यासाठी मंदिर समितीचा प्रतिवर्षी एक ते दिड कोटी इतका अतिरिक्त खर्च वाढणार आहे. याशिवाय, दि.03/01/2019 ते दि.31/03/2024 या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगातील भत्त्याच्या फरकाची रक्कम देखील कर्मचा-यांना मिळणार आहे. याबाबत कर्मचा-यांकडून आनंद व्यक्त होत आहे. या कर्मचा-यांच्या सेवा 10 ते 30 वर्षे झालेल्या आहेत असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
समिती कर्मचा-यामार्फत श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे यांचे व्यवस्थापन करण्यात येते. यासर्व देवदेवतांची पुजा-अर्चा, नित्योपचार, नैमत्तिक उपचार तसेच वर्षातील 4 उत्सव नियमितपणे पार पाडण्याची जबाबदारी कर्मचा-यांवर आहे. तसेच दर्शनरांग व्यवस्था, अन्नछत्र, गोशाळा, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, चप्पलस्टँड, मोबाईल लॉकर, सुरक्षा व इतर अनुषंगीक अशा विविध प्रकारच्या पुरेसा सोई सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे कर्मचारी सेवाभावाने व वेळेचे बंधन न ठेवता उपरोक्त कामे करीत असतात. सदर कर्मचा-यांची सेवा संरक्षित होऊन देखील कमी वेतन मिळत असल्यामुळे व वाढत्या महागाईमुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत होते. मंदिर समितीने आस्थापनेवरील कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र, सेवा शर्ती लागू करणे, अनुकंपा नियमावली, कर्तव्य सुची निश्चित करून देणे, विमा पॉलीसी अशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.
सदर प्रस्ताव मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालय व मंत्रालय स्तरावर मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री व आस्थापना विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री.रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव रात्री ७:३० ते १०:०० या वेळेत श्री संत तुकाराम भवन येथे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार वार ४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन शनिवार ५ ऑक्टोबर रोजी ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी महोत्सवात यांचा स्वराभिषेक रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ओंकार कला अकादमी चेन्नई व अतुल खांडेकर यांचे गायन सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वैष्णवी मगर यांचे अभंगगायन मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी उस्ताद रशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे यांचा दुमदुमली पंढरी बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी राम विधाते व बजरंग विधाते बंधू चे गायन तर गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शर्वरी वैद्य मुंबई व धनंजय जोशी नांदेड या ख्यातनाम गायक.गायिकांचा रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात सहभाग असणार असून त्या सर्व कलाकारांना तबला सुभाष कामत.पांडूरंग पवार.तेजोव्रत जोशी.निसर्ग देहूकर.कार्तिक स्वामी.माऊली खरात.हार्मोनिअम उदय कुलकर्णी.लीलाधर चक्रदेव. ओंकार पाठक.माधव लिमये.निवेदन उमेश बागडे.पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तर टाळ शिवराज पंडीत.अक्षय तळेकर.शरद जाधव.सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सर आदी कलाकार करणार आहेत. यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी
पंढरपूर (ता.26) - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली असून, दि. 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
याबाबत मंदिर समितीच्या दि. 20 ऑगस्ट रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले असून, भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
दि. 7 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहनही कार्यकारी अधिकारी श्री. शेळके यांनी केले आहे
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू; भाविकांना मिळणार सुलभ व जलद दर्शन
पंढरपूर (ता.07) - दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दिनांक 07 जुलै रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 26 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय, दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालवून भाविकांना जलद व सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 77 हजार किंमतीचे चांदीचे टाळ अर्पण.
पंढरपूर (ता.6):- हडपसर, पुणे येथील भाविक कमलेश अशोक मगर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस 1 किलो 055 ग्रॅम वजनाच्या चांदी वस्तू (टाळ) अर्पण केले आहेत. त्याची किंमत रू.77648/- इतकी आहे.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
या टाळाचा वापर श्रींच्या नित्योपचारावेळी भजन म्हणताना करण्यात येणार आहे.श्रींच्या गाभा-यातील मेघडंबरीचे काम पूर्ण
श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून लाकडी मेघडंबरी अर्पण; लाकडी मेघडंबरीस नांदेड येथील दानशुर भाविकाकडून २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण
पंढरपूर (ता.04) श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा येथील लाकडी मेघडंबरी चांदीने मडवून बसविण्यात आली असून, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. या मेघडंबरीस नांदेड येथील दानशुर भाविक श्री सुमित गणपतराव मोरगे, नांदेड यांनी 2 कोटी 45 लाखाची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदरच्या दोन्ही मेघडंबरी मंदिर समितीस प्राप्त झाल्या असून, मेघडंबरीचे पुजन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभा-यात बसविण्यात आली आहे व श्री रुक्मिणी गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ह.भ.प. विष्णु महाराज कबीर, विभाग प्रमुख संजय कोकीळ, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अतुल बक्षी, देणगीदार सुमित मोरगे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी सेवाभावी तत्वावर मोफत मिळाल्या होत्या. या दोन्ही मेघडंबरीस सुमारे 2 कोटी 45 लाखाची चांदी नांदेड येथील दानशुर भाविक सुमित मोरगे यांनी बसवून दिली आहे. त्यासाठी श्री विठ्ठल गाभा-यातील मेघडंबरीला सुमारे 135 किलो (रू 1 कोटी 46 लाख) व श्री रूक्मिणीमातेच्या गाभा-यातील मेघडंबरीला सुमारे 90 किलो (रू 99 लाख 73 हजार) चांदीचा वापर करण्यात आला असून, मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. सदर चांदीचा पत्रा 16 ते 26 गेजचा असून, सदरचे काम मे. जांगिड सिल्वर वर्क्स, पुणे यांनी केले आहे. त्यासाठी 13 कारागीरांनी 25 दिवसांत काम पूर्ण केले आहे.
याशिवाय, सदरच्या दोन्ही लाकडी मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडूरंग लोंढे या कारागीराने तयार केल्या होत्या. त्यासाठी देवरूख जि. रत्नागिरी येथील 3 ते 4 वर्षापूर्वीच्या सागवानी लाकडाचा वापर केला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले
कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळी बद्दल काम बंद आंदोलन..
पंढरपूर (ता.03) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी श्री अनंता रोपळकर यांना आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना, शशीकांत पाटील, तालुका अध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.
या शशीकांत पाटील नामक इसमास श्री विठ्ठल रुक्मिणी माता चांगली सद्गबुध्दी देवो व घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या दिनांक 4 जुलै, 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी सकाळी 10 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करणार आहेत
मंदिर समितीचे सर्व कर्मचारी या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. समितीचे कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य सेवाभावी वृर्तीने व जबाबदारीने पार पाडत आहे. तथापि, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे.
वरील सर्व बाबी विचारात घेता, संबंधित व्यक्तींना पांडुरंग चांगली सद्बुद्धी देवो व अशा गैरवर्तन करणाऱ्या इसमावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी उद्या सकाळी दहा पासून श्री चे नित्योपचार वगळता इतर कामकाज बंद ठेऊन आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद पाटील यांनी दिली
श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू
पंढरपूर (ता.28) श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासामध्ये उपहारगृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे उपहारगृह चालविण्यास देणेकामी ई लिलाव राबविण्यात आला होता. तथापि, सदर ई लिलावातील सर्व लिलावधारकांनी माघार घेतल्याने, सदरचे उपहारगृह मंदिर समिती मार्फत प्रायोगित तत्वावर चालविण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार आज शुक्रवार दिनांक 28 जून पासून मंदिर समिती मार्फत उपहारगृह सुरू करण्यात आले असून भाविकांना माफक दरात उत्तम भोजन मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदर उपहारगृहाचे उद्घाटन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभिम पावले, सहायक विभाग प्रमुख धनंजय कोकीळ व सावता हजारे उपस्थित होते. या उपहारगृहामध्ये चहा, नाष्टा व भोजन माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधीना निमंत्रण
पंढरपूर (ता.17):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. या महापूजेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे व सल्लागार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित असतात.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मानाच्या पालखीच्या विश्वस्तांनी शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीकडून निमंत्रण मिळावे अशी मागणी केली होती. त्यावर मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांची मागणी मान्य करून, या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांना प्रत्येकी दोन निमंत्रण पत्रिका देऊन सन्मानपूर्वक शासकीय महापूजेला आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत सोपान देव महाराज, श्री संत मुक्ताई, श्री संत नामदेव महाराज, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडण्यपूर, श्री संत चांगावटेश्वर महाराज, श्री संत निळोबाराय महाराज या प्रमुख 10 मानाच्या पालख्यांचा समावेश आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण.
पंढरपूर (ता.5):- मौजे कुंजीरवाडी, (ता. हवेली) येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख 91 हजार 110 इतकी आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने श्री तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते
श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास लाकडी मेघडंबरी अर्पण
पंढरपूर (ता.03) श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे सेवाभावी तत्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदरच्या दोन्ही मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडूरंग लोंढे या कारागीराने तयार केल्या असून, त्यासाठी देवरूख जि. रत्नागिरी येथील 3 ते 4 वर्षापूर्वीच्या सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. मेघडंबरीचे अनुक्रमे 160 व 110 किलो वजन आहे, सुमारे 3 लाख 50 हजार इतके बाजारमुल्य आहे व तयार करण्यासाठी 35 ते 40 दिवसाचा कालावधी लागला आहे. सदरचे काम मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. सदरच्या दोन्ही मेघडंबरीला चांदी लावून आषाढी यात्रेपूर्वी गाभा-यात बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी यावेळी सांगीतले.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन 2 जून पासून होणार सुरू
पंढरपूर (ता.18)- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून, त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक 2 जून 2024 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रापुर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. सदरचे काम करत असताना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी लागला आहे. सदरचे काम पूर्णत्वास येत असून, संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे. याशिवाय, 2 जून पासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
आषाढी यात्रा दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होत असून, आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठया प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सुलभ व तात्काळ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप या ठिकाणी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी दोन हजार कर्मचारी व स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दिनांक 07 ते 26 जुलै दरम्यान 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शनरांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाईव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष इत्यादी व्यवस्थेचा आढावा घेवून आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती दिली.
तत्पुर्वी श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील सुरु असलेल्या कामांची पाहणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत केली व संबधितांना आवश्यक सुचना यावेळी दिल्या.
श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा संवर्धन काम महिना अखेर पूर्ण होणार - गहिनीनाथ महाराज औसेकर.
मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची पुरातत्व विभागा सोबत पाहणी व आढावा बैठक,
पंढरपूर (ता.04)- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, कामास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारची नव्याने दुरुस्ती करण्याचे निदर्शनास आल्याने , माहे मे 2024 अखेर सदरचे काम पूर्ण करून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्वत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.
आज दि.4 मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली. तदनंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. तसेच गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे अतुलशास्त्री भगरे गुरुजी तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले व बांधकाम विभाग प्रमुख बलभीम पावले उपस्थित होते.
यावेळी सह. अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेणे व मूर्ती संरक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे. गाभाऱ्यातील फरशी काढल्यानंतर काही नव्याने कामाच्या बाबी निदर्शनास आल्यामुळे व काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने काम करण्यात येत आहे. सदरचे काम माहे मे, 2024 अखेर पूर्ण करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्यात येईल, तोपर्यंत सध्या सुरू असणारी दर्शनी व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाच्या कामांबाबत पुढील 15 दिवसात मंदिर समिती, सल्लागार परिषद, वारकरी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदर कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही, कामे दर्जेदार व मूर्तीचे संरक्षण करून करावयाची असल्याने वारकरी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
पंढरपूर (ता.1) महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मंदीर समितीचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामधील भोजन प्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. या भोजन प्रसादाचा सुमारे 1000 ते 1200 भाविकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर दुपारी पोशाखा वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस परंपरेनुसार दागिने परिधान करण्यात आले होते.
चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्य पूजा संपन्न
पंढरपूर (ता.19) चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प प्रकाश महाराज जंवजाळ यांनी केली. वारकरी संप्रदायातील महत्त्वाची वारीपैकी चैत्री वारीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगृहाचे संवर्धन करण्याचे काम सुरू असल्याने भाविकांना मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, शुध्द पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे.
श्रीच्या गर्भगृह संवर्धन कामांची पाहणी काम वेळेत पूर्ण करण्याच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सूचना
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा,
पंढरपूर (ता.17) - चैत्र शुध्द नवमीला प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास दुपारी 12.00 वा. पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून राम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यावेळी राम जन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. तसेच श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे श्री. विठ्ठल सभामंडप येथे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख संजय कोकीळ व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता, सुमारे 2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला
चैत्री वारीत तीन लाख बुंदी लाडू प्रसाद व 50 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी;
पंढरपूर (ता. 17) श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पार पडतात. त्यामध्ये तुलनेने संख्यात्मक दृष्ट्या कमी असणारी चैत्र यात्रा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी संपन्न होत आहे. या यात्रेला पंढरपूर शहरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक असतात. या भाविकांना श्री चा प्रसाद म्हणून अल्पमुल्य देणगी आकारून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. या वारीला सुमारे तीन लक्ष बुंदी लाडू प्रसाद व पन्नास हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी असणार आहे. त्यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समिती मार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून एमटीडीसी भक्त निवास येथील लाडू उत्पादन केंद्रांमध्ये तयार करण्यात येतो. तसेच राजगिरा लाडू प्रसाद हा आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी दिली. वारीला येणारा प्रत्येक भाविक हा लाडू प्रसाद खरेदी करत असतो आणि या भाविकांना पुरेशा प्रमाणात लाडू प्रसाद उपलब्ध व्हावा असे नियोजन मंदिर समितीमार्फत करण्यात आले असून, या कामाची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख श्री पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे. मंदिर परिसरात पश्चिम द्वार व उत्तर द्वार येथे कायमस्वरूपी लाडू स्टॉल उभा करण्यात आले असून, सदरचे स्टॉल सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. बुंदी लाडू प्रसादासाठी चांगल्या दर्जाची कोरडी हरभरा डाळ, डबल रिफाइंड शेंगदाणा तेल, बेदाणा, काजू, वेलदोडे, रंग, सुपर एस साखर इत्यादी घटक पदार्थाचा व पॅकिंग साठी पर्यावरण पूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत आहे. या बुंदी लाडू प्रसादासाठी सुमारे 50 कर्मचारी/ स्वयंसेवक सेवा देत असून, अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे.
श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पुजेला सुरुवात
पंढरपूर (ता.09):- ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला मंगळवार दिनांक 9 एप्रिल पासून सुरुवात झाली असल्याचे श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली. प्रतिवर्षी या पूजा भाविकांना देणगी मुल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येतात. तथापि, गर्भगृह संवर्धनाचे काम सुरू असल्याने, पदस्पर्शदर्शन बंद आहे. त्यामुळे पदस्पर्शदर्शन सुरू होईपर्यंत भाविकांच्या हस्ते पुजा बंद करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या चंदनउटी पुजा मंदिर समिती मार्फत करण्यात येत आहे.
॥ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण मोठ्या उत्सवात साजरा ॥
चैत्र शुध्द 1 हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे नवीन वर्षारंभाचा दिवस आहे. नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस नवीन महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंदिरात सकाळी 8.00 वाजता मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते ध्वज पुजन करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहाय्यक विभाग प्रमुख प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, श्री संत नामदेव पायरीवरील (महाद्वारावरील) गोपूर, श्री रुक्मिणी उत्तरद्वार गोपुर, या ठिकाणी विधिवत पूजा करून ध्वज लावण्यात आले. सकाळी पंचांग पूजन करण्यात आले. मंदिर समितीचे पुजारी वेद शास्त्र संपन्न समीर कौलगी यांनी पंचांग वाचन केले. या दिवसापासून श्रीं चे महानैवेद्यामध्ये श्रीखंड वापरण्यास सुरवात करण्यात येत असून, दुपारी पोशाखावेळी श्रीं स अलंकार परिधान करण्यात आले. श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत श्रींचे पदस्पर्शदर्शन बंद करून फक्त पहाटे 5.00 ते सकाळी 11.00 पर्यंत मुखदर्शन भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या, गुढीपाडवा सणाला भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन, या दिवशी पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.॥ अन्नछत्रात वर्धापन दिनांनिमित्त विशेष भोजन प्रसाद ॥
हिंदू धर्मात अन्नदानाचे महत्व अनन्य साधारण आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे. मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथे विनामूल्य अन्नछत्र सुरू असून, या अन्नछत्राचा सन 1996 पासून गुढीपाडव्याचया शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला आहे. आज अन्नछत्राचा वर्धापन दिन असल्याने विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नछत्रामध्ये दु.12.00 ते 2.00 व रा.7.00 ते 9.00 या वेळेत मोफत पोटभर भोजनप्रसाद भाविकांना उपलब्ध करून देतो, त्याचा दैनंदिन 2500 ते 3000 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आज वर्धापन दिनांनिमित्त मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या शुभहस्ते पुजा करून भाविकांना भोजन प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख राजेश पिटले, बलभिम पावले, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते. यां अन्नछत्रामध्ये अन्नदान करण्यासाठी विविध योजना असून इच्छुक भाविकांना कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती जाणून घेता येईल.